कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीतर्फे काल कोल्हापूर येथील झालेल्या सभेत लोकसभेच्या पाच जागांची उमेदवारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केली. पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची त्यांनी घोषणा केली.
हातकणंगले येथून एका उलेमांना उमेदवारी दिली जाणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. काल कोल्हापूर येथे डाॅ. आंबेडकर यांची शिवाजी स्टेडियमवर सभा झाली. यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. कोल्हापूरच्या जागेसाठी कोण उमेदवार असेल याची घोषणा मात्र त्यांनी केली नाही.
खासदार असदुद्दीन ओवेसी येणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे शिवाजी स्टेडियम गर्दीने भरले होते. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगाव, निपाणी व सीमाभागातून लोक आले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर बोलण्यास उभे राहताच सर्वांनी मोबाईलचे फ्लॅश चमकवीत स्टेडियमभर लखलखाट केला.