नवी दिल्ली वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने KYC साठी कागदपत्रांची नवी यादी जारी केली आहे, ज्याद्वारे तुम्ही बँकेच्या केवायसीचे काम पूर्ण करू शकता. आरबीआयने जारी केलेल्या या यादीत एनपीआर लेटरला केवायसी व्हेरिफिकेशनसाठी वैध कागदपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. एनपीआर अथॉरिटीने दिलेल्या पत्राच्या मदतीने तुम्ही बँकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. या डॉक्युमेंट्सचा वापर तुम्ही नवीन बँक खाते उघडण्यासाठी करू शकता. परंतु, आरबीआयने हेदेखील स्पष्ट केले आहे की, केवळ एनपीआर लेटरच अनिवार्य नसून अन्य कागदपत्रांच्या मदतीनेही केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
या कागदपत्रांच्या मदतीने पूर्ण करू शकता केवायसी
जानेवारीत जारी करण्यात आलेल्या आरबीआयच्या या नव्या निर्देशानुसार, नो युअर कस्टमर (केवायसी) साठी वापरल्या जाणार्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड आणि एनपीआर पत्र यांचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही एका कागदपत्राच्या मदतीने तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. आरबीआयने या कागदपत्रांना अधिकृतपणे वैध कागदपत्र म्हणून घोषित केले आहे.
जाहिरातीवरून झाला होता वाद
अधिकृत वैध कागदपत्र म्हणजे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार नंबर, भारतीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले मतदान ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, अथवा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर वापर केवायसी व्हेरिफिकेशनसाठी केला जाऊ शकतो. परंतु, काही दिवसांपूर्वीच एका तेलुगू वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये म्हटले होते की, बँक केवायसी प्रक्रियेसाठी नॅशनल पॉप्युलेशनल रजिस्टर म्हणजेच एनपीआरचे पत्र जमा करणे अनिवार्य आहे.
व्हिडीओद्वारे सुद्धा होऊ शकते व्हेरिफिकेशन
केंद्रीय बँकेने काही दिवसांपूर्वी व्हिडीओवर आधारित कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेसबाबत घोषणा केली होती. आरबीआयने या बँक केवायसीला व्ही – सीप नाव दिले होते. ही एक फेस – टू – फेस व्हेरिफिकेशन प्रक्रिया असेल, जिच्या सहाय्याने केवायसी व्हेरिफिकेशन केले जाईल.
काय आहे केवायसी
नो युअर कस्टमर प्रक्रियेत बँक ग्राहकांकडून जरूरी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करते, जेणेकरून बँकेच्या कोणत्याही सेवेचा चुकीचा वापर केला जाऊ नये. ही प्रक्रिया नवी खाते उघउताना पूर्ण केली जाते, आणि वेळीवेळी बँक ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत.