बारामती : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या दोन वर्षापासून इंदापूर आणि बारामती तालुक्यात प्रचंड दहशत माजवून पोलिसांना गुंगारा देणारा गुंड बाळा दराडे याच्या अखेर बारामती तालुका पोलिसांनी नाशिकमधून मुसक्या आवळल्या आहेत. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दराडेला अटक केली आहे.
बाळा दराडे याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरोधात भिगवण पोलिसात सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. विशेषतः त्याने गुन्हेगारी क्षेत्रात युवकांना ओढून आपले साम्राज्य उभे केले होते. गेल्या काही वर्षात त्याने बारामती एमआयडीसी तसेच भिगवण व इंदापुर तालुक्यात मोठी दहशत माजवली होती.
पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता; मात्र वेळोवेळी पोलिसांना तो चकवा देण्यात यशस्वी होत होता. दराडेची माहिती देणाऱ्यास ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी 50 हजाराचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र तरीही तो सापडत नव्हता. तो नाशिकमध्ये असल्याची माहिती बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळताच ढवाण व त्यांचे गुन्हा शोध पथकाने नाशिक येथे जाऊन मोठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.