बदलापूर : बहुजननामा ऑनलाईन – बदलापूरात ढाब्याच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवणाऱ्या अनधिकृत ढाब्यावर पोलिसांनी धाड टाकून 13 जणांवर कारवाई केली. उल्हासनगरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. बदलापूर शहरात अनेक ठिकाणी ढाब्याच्या नावाखाली हुक्का पार्लरचा (Hookah Parlor)धंदा तेजीत आहे, मात्र आता गुन्हे शाखेने ही कारवाई करताच स्थानिक पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बदलापूर पूर्वच्या कर्जत महामार्गालगत असलेल्या सक्सेस पॉईंट या अनधिकृत ढाब्यात गेल्या अनेक दिवसांपासून हे हुक्का पार्लर सुरू होते. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देऊनही स्थानिक पोलीस या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत होते.
मात्र उल्हासनगरच्या गुन्हे शाखेने इथे धाड टाकत डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर मधील 13 तरुणांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे आणि साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.