अकोला : बहुजननामा ऑनलाइन – राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा आक्रमकपणा सोडलेला नाही. त्यांचा हाच आक्रमकपणा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी (दि. 5) पुन्हा पाहायला मिळाला. रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत बच्चू कडू यांनी अचानक आज तिथे भेट देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी एका कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कडू यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे आल्या होत्या. त्यामूळे कडू यांनी मंगळवारी या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. कडू यांनी प्रत्यक्ष जेवणाच्या व्यवस्थेची पाहणी केली असता जेवण पाहून त्यांचा संताप अनावर झाला. वैद्यकीय महाविद्यालयातील गेल्या वर्षभराच्या जेवणाच्या खर्चाचा हिशोबही संबंधितांकडून दाखवण्यात आला नाही. पूर्ण वर्षाचं रेकॉर्डच त्यांच्याकडे नव्हते. त्यावर कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जेवणाच्या दर्जाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कडू यांनी विचारणा केली, असता त्याने कडू यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कडू यांनी रागाच्या भरात या कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली. दरम्यान, पालकमंत्री कडू यांनी यापूर्वी देखील या वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केली होती. त्यावेळी सुद्धा असाच प्रकार त्यांच्या निदर्शनास आला होता. येथे रुग्णांना कशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. याचे व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत. मात्र यंत्रणा सुधारत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.