Baba Siddique Murder Case | इंटरनेट हॉटस्पॉट वापरून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला?, गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान हत्येतील आरोपीकडून रहस्य उघड

November 22, 2024

मुंबई: Baba Siddique Murder Case | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते (Ajit Pawar NCP), माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) तपासादरम्यान पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या आकाशदीप गिलने (Akashdeep Gill) अनेक रहस्य उघड केली आहेत.

अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi), शुभम लोणकर (Shubham Lonkar) आणि झिशान अख्तर (Zeeshan Akhtar) यांच्याशी तो कशा पद्धतीने संपर्क करून संवाद साधायचा हे सांगितले आहे. इंटरनेट हॉटस्पॉट वापरून त्याने त्याचे लोकेशन कशाप्रकारे लपवले, जेणेकरून कोणालाही त्याच्याबद्दल माहिती मिळू नये याचीही माहिती त्याने दिली आहे.

गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपी आकाशदीप गिल याला पंजाबच्या फाजिल्का येथून अटक करण्यात आली असून, तो मास्टरमाईंड अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि झिशान अख्तर आणि शूटर शिवकुमार गौतम यांच्यासह बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी त्याच्या शेतात काम करत असलेल्या मजुराच्या मोबाईलच्या हॉटस्पॉटचा वापर करायचा. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने ही युक्ती अमलात आणली होती.

बलविंदर नावाच्या मजुरानेही इंटरनेट कॉल्ससाठी त्याचा हॉटस्पॉट वापरल्याची माहिती क्राइम ब्रँचला दिली आहे. चौकशीदरम्यान गिलने या मजुराचा वापर इंटरनेट हॉटस्पॉटसाठी केल्याची कबुलीही दिली. आरोपी आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवायचा आणि शेतात काम करणाऱ्या बलविंदर याच्या हॉटस्पॉटचा वापर करून इंटरनेटशी कनेक्ट करायचा. कोणीही त्याचा फोन शोधू नये म्हणून त्याने ही युक्ती वापरली. त्यामुळे त्याचा फोन ऑफलाइन दिसायचा.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी क्राइम ब्रँच सध्या गिलच्या मोबाईलचा शोध घेत आहे. भाऊ अनमोल बिश्नोईने स्पेशल २६ ची टीम तयार करण्यासाठी अनेक महिने घालवले होते. या लोकांना नेमण्यासाठी शूटर्सच्या नियमित मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. ऑनलाईन मुलाखती साबरमती जेलमध्ये असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतल्या होत्या.