Baba Siddique Murder Case | पोलिसांच्या कोठडीत असताना लॉरेन्स बिष्णोईच्या शूटरचा माध्यमांशी संवाद; नाना पटोले म्हणाले – ” दाल मे कुछ काला है”
मुंबई: Baba Siddique Murder Case | माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) आणि त्याची टोळी चर्चेत आहे. दिल्लीमध्ये एका व्यायामशाळेच्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधून बिष्णोई टोळीच्या योगेश कुमारला नुकतीच अटक झाली. हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.
यावेळी बोलताना त्याने बाबा सिद्दीकी यांच्यावर विविध आरोप केले आहेत. “बाबा सिद्दीकी हे चांगले व्यक्ती नव्हते, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. तसेच त्यांचे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) संबंध होते”, असा दावा योगेश कुमारने केला.
योगेश कुमारने कोठडीत असतानाही पत्रकार परिषद घेतल्याच्या थाटात माध्यमांशी संवाद साधल्यामुळे पोलिसांवरही टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सदर व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर टाकून भाजपावर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले, “मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपाच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेऊ दिली जाते? दाल मे कुछ काला है”, असे पटोले यांनी म्हंटले आहे.
Comments are closed.