मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राजामौली यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्वांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.
‘गेल्या काही दिवसांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना हलका ताप होता. ताप कमी झाला पण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही कोरोनाची चाचणी केली. माझा व कुटुंबीयांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्हाला घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे’, असे ट्विट राजामौली यांनी केले आहे. ‘आम्हा सर्वांची प्रकृती ठीक असून आता काहीच लक्षणे नाहीत. डॉक्टरांनी सांगितलेले सर्व उपचार करत आहोत आणि काळजी घेत आहोत. आमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होण्याची वाट पाहत आहोत, जेणेकरून आम्ही आमचा प्लाझ्मा दान करू शकू’, राजामौली यांच्या या ट्विटनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी व चाहत्यांनी त्यांच्यासाठी ट्विट केले आहेत. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. असे नेटकर्यांनी म्हटले आहे.