औरंगाबाद: बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांचे आकडे रोज नवे विक्रम गाठताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने 1 मे पर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2020 पदवीच्या आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 दिवस पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा 2 मे पर्यंत स्थगित केल्या आहेत. या परीक्षा 3 मे नंतर घेण्यात येतील आणि त्यावेळी परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने पत्रक काढून दिले आहे.
तसेच विद्यापीठाने ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2020 पदव्युत्तर आणि इतर अभ्यासक्रमाच्याही परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्या परीक्षा 5 मे 2021 नंतर होणार आहेत. तसेच मे महिन्यातील परीक्षा जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे. या पत्रकानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या द्वितीय सत्राच्या सर्व अभ्यासक्रमांचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु राहणार आहेत. दरम्यान यापूर्वीच बोर्डाने 10 आणि 12 वीच्या परीक्षाही पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे.