बहुजननामा ऑनलाइन टीम – भारताचा माजी क्रिकेटर आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैना कौटुंबिक कारणामुळे यूएईहून भारतात परतला आहे. तो आयपीएलचा 13वा सीझन खेळणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, रैनाचा एक जवळचा नातेवाईक हॉस्पीटलमध्ये गंभीर स्थितीत आहे, तर त्याच्या काकांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या नातेवाईकांवर पठानकोटच्या थरियाल गावात मध्यरात्री हल्ला झाला होता. कथित हल्ला 19 ऑगस्टच्या रात्री झाला, जेव्हा कुटुंब आपल्या घराच्या टेरेसवर झोपले होते. तेव्हा अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला केला.
या हल्ल्यात सुरेश रैनाची आत्या आशा देवी गंभीर जखमी झाली आहे आणि ती हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी लढत आहे, तर आशा देवी यांचे पती 58 वर्षीय अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. रैनाचा आत्तेभाऊ 32 वर्षीय कौशल कुमार आणि 24 वर्षांचा अपिन कुमार यांना दुखापत झाली आहे. मात्र, या प्रकरणात अजूनपर्यंत रैनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
15 ऑगस्टला इंटरनॅशनल क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर रैनाचे सर्व लक्ष आयपीएलवर होते. तो मैदानावर उतरण्यासाठी उतावीळ असल्याचे दिसत होते. परंतु, अचानक तो आयपीएलमधून बाहेर पडल्याने एमएस धोनीच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.