आरोपीच्या नातेवाईकांकडून पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, 3 पोलीस कर्मचारी जखमी; 6 जणांवर FIR दाखल
इंदापूरः बहुजननामा ऑनलाईन – दरोडा टाकून टाकून गेल्या 3 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला सुगाव (ता.इंदापूर) येथील राहत्या घरातून अटक केली. त्याला पोलीस गाडीतून घेऊन जात असताना आरोपीच्या नातेवाईकांनी गाडीचा पाठलाग करून वाहनाला धडक देेेत पोलिसांना मारण्याचा व आरोपीला सिनेस्टाईल पळवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 11) माळवाडी नं. 1 येथे घडली आहे. यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी दत्तू नारायण सावंत, रोहन दत्तू सावंत, अमोल दत्तू सावंत, उर्मिला दत्तू सावंत, शर्मिला दत्तू सावंत, सुरेखा दत्तू सावंत (सर्व रा. सुगाव, ता. इंदापूर, जि.पुणे) या सर्व आरोपीवर इंदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी योगेश रावसाहेब चितळे (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान टेंभुर्णी पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल सावंत याला अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
इंदापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल सावंत याने सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 महिन्यापूर्वी दरोडा टाकला होता. तेंव्हापासून तो फरार होता. खबर्यामार्फत आरोपीची माहिती मिळाल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला सुगाव येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. आरोपीला घेऊन टेंभुर्णी पोलीस इंदापूरकडे वाहनाने येत असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने (एमएच.12- एएच. 2515) माळवाडी नं. 1 येथे पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी आरोपींनी अमोल सावंत याला सिनेस्टाईल पोलिसांच्या तावडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस गाडीला पाठीमागुन व चार ते पाचवेळा जोराची धडक देवुन पोलीस गाडी चक्काचूर केली आहे. तसेच आरोपी अमोल सावंत याने फिर्यादींना मारहाण करत पळुन जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांना धक्काबुक्की केली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत.
Comments are closed.