बहुजननामा ऑनलाईन – इतर बँकांचे एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे लवकरच कमी होणार आहेत. याबाबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून विचार सुरु असून पुढील महिन्यापासून हे शुल्क कमी केले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
आरबीआयने एटीएम वापराबाबतच्या सर्व शुल्कांची समीक्षा करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची शिफारस या समितीकडून करण्यात आली आहे तसेच या समितीने आपला अहवालही तयार केला आहे. आरबीआयकडे ही समिती लवकरच आपला अहवाल सुपूर्द करणार आहे. एटीएमचा गेल्या काही काळातील वाढलेला वापर पाहून आवश्यक त्या सर्व शुल्कांची समीक्षा करून या समितीने आपला अहवाल तयार केला आहे.
अनेक दिवसापासून ग्राहकांकडून एटीएमच्या वापरासाठीचे शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. रिझर्व्ह बँकेने त्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींसह बँकांचे अधिकारी आणि ग्राहकांच्या प्रतिक्रियेचाही समावेश होता. अशा या समितीचा अहवाल आता तयार झाला आहे. पुढील महिन्यात तो सादर केल्यानंतर आठवडाभरात त्या शिफारशी अंमलात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सध्या महिन्यातून पाच वेळा अन्य बँकांचे एटीएम विनाशुल्क वापरता येते. तर हि मर्यादा मात्र मेट्रो शहरांसाठी तीन व्यवहारांची आहे.