नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – काटोल नगरपरिषदेतर्फे भोयर-पवार समाजाला हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नगरपरिषद तत्पर आहे. या जागेवर राजा भोज बालसंस्कार भवन बांधण्यात येणार असून बालसंस्कार केंद्र, वसतिगृह आणि शेतकऱ्यांसाठी निवासी धर्मशाळा उभी राहील, असे प्रतिपादन नगर परिषदेचे गटनेते चरणसिंग ठाकूर यांनी केले.
काटोलच्या पंचवटी भागात भोयर-पवार महासंघाच्या काटोल शाखेतर्फे आयोजित समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भोयर-पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ. नामदेव राऊत होते. सुभाष कोठे, कारंजा पंचायत समितीचे सभापती मंगेश खवशी, जिल्हा परिषद सदस्य सरिता गाखरे, माजी सदस्य डॉ. हरिभजन धारपुरे, महासंघाचे महामंत्री मधुकर चोपडे, युवा भोयर-पवार मंचचे अध्यक्ष श्रावण फरकाडे, सुरेश देशमुख, महासंघाचे सचिव मोरेश्वर भादे, डॉ. तीर्थनंदन बन्नगरे, पत्रकार गणेश खवसे, नीलेश फरकाडे, महादेवराव चोपडे, अशोक गोरे, प्रमोद धारपुरे नगरसेविका जयश्री भुरसे, काटोल शाखेचे अध्यक्ष प्रा. वसंत खवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बालसंस्कार केंद्र, वसतिगृह आणि शेतकऱ्यांसाठी निवासी धर्मशाळा फलकाचे अनावरण करण्यात आले. चरणसिंग ठाकूर यांनी ५० लाख रुपये निधीतून भोयर-पवार समाजाकरिता बालसंस्कार भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, सरपंच-उपसरपंच, पोलीस पाटील, समाजसेवी, दानदाते, सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक वसंत खवसे यांनी केले. संचालन प्रा. जगदीश खवसे व वनिता गोरे यांनी केले. मनोहर पठाडे यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आभार संजय ढोले यांनी मानले. आयोजनासाठी ईश्वर घागरे, डॉ. विलास फरकाडे, मदन ढोले, अरुण मुन्ने, ज्ञानेश्वर धारपुरे, राजू देशमुख, ताराचंद मुन्ने, इंद्रजित बारंगे, श्याम बन्नगरे, दिलीप गाखरे, मधुकर रमधम, शेषराव बारंगे आदींनी सहकार्य केले.