बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या ड्रग्ज, पब आणि पार्टी या कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात आहेत असा दावा भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून त्यांनी या ठिकाणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आशिष शेलार पत्रात लिहितात, “मुबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील बेकायदा अंमली पदार्थांच्या समस्यांसदर्भात मी सातत्यानं पोलिसांचं लक्षत वेधत आहे. यावर तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे. वांद्रे वरळी सी लिंक जवळील वस्ती व वांद्रे रेक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल डीसीपी, अँटी नार्कोटीक्स सेलला 14 मार्च रोजी मी पत्र लिहिलं होतं. परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही किंवा जर कारवाई झाली असेल तर मला याबद्दल कल्पना दिली गेलेली नाही” असं शेलार पत्रात म्हणतात.
शेलार पुढे म्हणतात, “ड्रग्जच्या व्यसनामुळं देशातील तरुणांचं आयुष्य उध्वस्त होत आहे. मादक पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित घटकांचा थेट संबंध भारताविरुद्ध काम करणाऱ्या परदेशी शक्तींसोबत आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि देशाच्या करमणूक उद्योगाचे मुख्य केंद्र असल्यानं या राष्ट्राविरोधी दहशतवादी संघटनांचे मुंबईवर लक्ष आहे. माझ्या वांद्रे, खार, सांताक्रूज या मतदारसंघात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट आहेत जे कायद्यांचे आणि नियमांचे उल्लंघन करत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या पब पैकी अनेकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं आहे आणि परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाईटलाईफ पार्ट्या सुरू असतात. हीच ठिकाणं आहेत जिथं बेकायदेशीर ड्रग्सच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पोलीस आणि महापालिका दुर्लक्ष करत असल्यानं हे सारं राजेरोसपणे सुरू आहे” असा थेट आरोप शेलारांनी केला.
सुशांतच्या प्रकरणात चर्चेत आलेल्या अवैद्य अंमली पदार्थांचे अनेक अड्डे माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात असून त्याकडे मी वारंवार पोलीस, संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधतो आहे. पण कारवाई होत नाही आज पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली. pic.twitter.com/cHNFoNRY4t
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 31, 2020
शेलार म्हणतात, “90 च्या दशकात मुंबई पोलिसांनी जसं अंडरवर्ल्ड नष्ट केलं, तसंच ड्रग माफियांचं नेटवर्क नष्ट करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणं आवश्यक आहे. अशा नेटवर्कशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची गरज आहे. सुशांतच्या साथीदारांनी वापरलेलं बेकायदेशीर ड्रग वांद्र्यातील काही ठिकाणांहून आणलं गेलं असावं अशी चर्चा आहे. पोलीस प्रशासनानं आता तरी याचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. माझ्या मतदारसंघातील बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या अड्ड्यांबाबत मी अनेकदा नावानिशी तक्रार केली आहे. पुन्हा एकदा आपल्याला याबाबत विनंती करत आहे. हे अड्डे उध्वस्त करून सुशांतसारख्या हजारो तरुणांना ड्रग्सच्या जाळ्यातून सोडवावं” अशी विनंती शेलारांनी केली.
शेलारांनी पत्रात उल्लेख केलेले अंमली पदार्थांचे अड्ड पुढीलप्रमाणे –
1) वांद्रे सी लिंक प्रोमेनेड, आय लव्ह मुंबई परिसर
2) वांद्रे पश्चिम, रेक्लेमेशन परिसरात राहुल नगर, नर्गिस दत्त नगर, रंगशारदा हॉटेलच्या समोर आणि मागील बाजू
3) वांद्रे पश्चिम, बीएमसी गार्डन (जनरल अरुणकुमार वैद्य गार्डन) अरुण वैद्य नगर तसेच गझदर बांधची खाडीजवळची अवैध झोपडपट्टी
4) मुरगन चाळ, सांताक्रूज पश्चिम
5) वांद्रे स्टेशन पश्चिम परिसरातील शास्त्री नगर
6)ओएनजीसी लेन वरीव पब आणि बार, वांद्रे रेक्लेमेशन