बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवाजी विद्यापीठाच्या प्र.कुलगुरुपदी फिजिक्स विभागातील प्रा. डॉ. पी. एस. पाटील (Dr. P.S. Patil) यांची निवड झाली आहे. विद्यापीठाचे ते सातवे प्र. कुलगुरु असून सायन्स फॅकल्टीमधील ते पाचवे आहेत. निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुलगुरुपदी डॉ. डी. टी. शिर्के विराजमान झाल्यानंतर प्र. कुलगुरु कोण होणार याची उत्सुकता विद्यापीठ वर्तुळात होती. डॉ. पाटील यांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केला होता. मात्र पहिल्याच फेरीत त्यांचा अर्ज फेरीतून बाहेर पडला. परिणामी प्र. कुलगुरु पदावर विद्यापीठातील की संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकाची वर्णी लागणार याची चर्चा होती. मात्र डॉ. पाटील यांच्या निवडीमुळे या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातून बी. एस्सी व एम. एस्सीचा अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. ते 1990 मध्ये न्यू कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर ते 1995 ला विद्यापीठाच्या फिजिक्स विभागात रुजू झाले. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर 219, राष्ट्रीय 25, राज्यस्तरावर 11 शोधनिबंध प्रसिध्द आहेत. त्यांच्या मार्गदशर्नाखाली 28 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. मिळवली असून 14 विद्यार्थी पीएच. डी. संशोधनाचे काम करत आहेत. चार विद्यार्थी एम. फिल झाले आहेत. स्कूल ऑफ नॅनो सायन्सचे समन्वयक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत.