नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी ते म्हणाले होते की, “आज जम्मू काश्मीर घेतलं आहे. उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर काश्मीरही घेऊ. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील असा मला विश्वास आहे” असे ते म्हणाले होते.
यानंतर मात्र संजय राऊत यांच्या भाषणाचे आणि मोदी सरकारच्या या निर्णयाचे पाकिस्तानात पडसाद उमटल्याचे दिसत आहे. इस्लामाबादमध्ये अनेक पोस्टर दिसत आहेत ज्यावर लिहिलं आहे की, “महाभारत- स्टेप फॉरवर्ड” याशिवाय संजय राऊत जे काही म्हणाले आहेत तेही पोस्टवर लिहिलेलं दिसत आहे. एएनआयने यासंदर्भात केलेले ट्विट या पोस्टरवर आहे.
https://twitter.com/TajinderBagga/status/1158697289080160257
पाकिस्तानी तरूणाने या पोस्टर्सचा एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की, “मला कळत नाही आपला देश कुठे चालला आहे. आपल्याच देशात राजधानीच्या शहरात आपल्या डोळ्यादेखत आपल्याच विरोधात हे हिंदुस्थानी पोस्टर्स लावत आहेत आणि आपण झोपलो आहोत. एक दोन नव्हे तर माझी नजर जाईल तिथपर्यंत हे पोस्टर दिसत आहेत. म्हणजे आपण या देशात फक्त राहतो आहोत. आपलं काही कर्तव्य नाही का ? की, आपल्याला काही करायला पाहिजे.” असा सवाल त्या तरुणाने विचारला आहे. सध्या मात्र हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.