बहुजननामा ऑनलाईन : बॉलीवूडला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी (वय-37) यांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रिशनेनंदू हे ३७ वर्षांचे होते. क्रिशनेनंदू चौधरी यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारच्या खणीवडे खाडीत सापडला, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी यावर कारवाई करत मुख्य आरोपीला अटकही केली आहे. मोहम्मद फुरकान ( वय-38, रा. मालाड) असे आरोपीचे नाव आहे. क्रिशनेनंदू चौधरी हे मुंबईतील गोरेगाव भागात राहत होते. ते बॉलिवुडमध्ये फिल्म स्टुडिओमधील सेटचे डिझाईन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. क्रिशनेंदू चौधरी हे चित्रपट, मालिका, व्हीआयपी लग्न सोहळे यांच्या सेटचे डिझाईन तयार करून आरोपी मोहम्मद फुरकान याला देत होते. मोहम्मद फुरकान हा सेट उभारण्याचे काम करायचा.
काय आहे प्रकरण ?
दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरु होते. क्रिशनेनंदू यांचे फुकरानकडे ८५ हजार रुपये अडकलेले होते. ७ ऑगस्टला दोघे भेटले होते. तेव्हा त्यांचे वाद विकोपाला गेले होते. आरोपी फुकरान यांने त्याच्या दोन साथीदारांसह क्रिशनेनंदू यांना मालाड पश्चिमेकडील आर्यलँड भागात नेले. तिथे त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्यांना ठार मारले. नंतर त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधून रात्री उशिरा एका कारमध्ये टाकून तो विरार खणीवडे येथील खाडीत फेकून दिला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची ३ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मुख्य आरोपी मोहम्मद फुरकान याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.