मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कारवाई करताना अंगझडतीत मिळालेल्या रक्कमेपैकी निम्मी रक्कम परस्पर हडप करणारा पोलीस उपनिरीक्षक आणि तडीपार न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या सहायक पोलीस निरीक्षकाला एसीबीने रंगेहाथ पकडले.
पोलीस उपनिरीक्षक अमोल पोपट गाडे (वय २७, नेमणूक धारावी पोलीस ठाणे) सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर दशरथ जोशी (वय ४४, नेमणूक धारावी पोलीस ठाणे) अशी दोघांची नावे आहेत.
फिर्यादी हे खासगी बांधकाम कॉन्ट्रक्टर आहेत. त्यांच्या मुंबई येथे २८ एप्रिल २०२१ रोजी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फिर्यादी यांना अटक करताना पोलीस उपनिरीक्षक अमोल गाडे याने त्यांची अंगझडती घेतली. त्यात त्यांना ४० हजार रुपये, मोबाईल व इतर वस्तू मिळाल्या. या वस्तू परत करण्यासाठी त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्याची फिर्यादी यांनी २० मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन २१ मे रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान अमोल गाडे याने फिर्यादीकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच अंगझडतीत केवळ ३० हजार रुपये मिळाल्याचे सांगून त्यापैकी १५ हजार रुपये स्वत:साठी काढून घेतले व उर्वरित १५ हजार रुपये परत दिले.
त्यानंतर अमोल गाडे याने फिर्यादीवर प्रतिबंधक कारवाई करण्याकरीता सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर जोशी याच्यासमोर हजर केले. जोशी याने फिर्यादीला प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी व तडीपार न करण्यासाठी फिर्यादीकडे १२ हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सापळा कारवाई दरम्यान तडजोडीअंती जोशी याने १० हजार रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांवर धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.