बहुजननामा ऑनलाइन टीम – जर तुम्ही पाठदुखी आणि कंबरदुखीनं त्रस्त असाल तर तुमच्या रोजच्या जीवनातील काही सवयीत तुम्हाला बदल करणं( back pain) गरजेचं आहे. तसं पाहिलं तर फक्त एकाच ठिकाणी सतत बसून पाठदुखीचा त्रास होतो असं काही नाही. याची अनेक कारणं आहेत. आज आपण यामागील कारणं आणि उपाय जाणून घेणार आहोत.
पाठदुखीची कारणं पुढीलप्रमाणे –
1) मानसिक ताण तणाव
2) पाठीला किंवा त्या भागातील अवयवांना इजा झाली असेल तर पाठ दुखू शकते. फ्रॅक्चर झाल्यास किंवा पडल्यासही पाठदुखी उद्भवू शकते.
3) स्नायू आकुंचन पावणं.
4) ताणलेले स्नायू किंवा अस्थिबंध.
5) अचानक विचित्र हालचाली करणं.
6) खूप जड वजन उचलणं.
7) चुकीच्या पद्धतीनं वजन उचलणं.
दरम्यान ऑस्टियोपोरोसिस, संधिवात, सिटीका, डिस्क बल्ज, डिस्क्स तुटणं, कण्याला वक्राकार आकार येणं, मुत्रपिंड समस्या या कारणांमुळंही पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
पाठदुखीवरील उपाय पुढीलप्रमाणे –
1) जर पाठ दुखत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित व्यायाम करावा. फिजिओथेरपिस्ट सोबतही चर्चा करायला हवी.
2) आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असावा. यामुळं हाडं मजबूत होतात.
3) पोटाभोवती वाढलेलं वजन तुमच्या पाठीवर ताण आणू शकतं. जास्त वेळ एकाच स्थितीत घालवला तर मणक्याला अनैसर्गिक वक्रता येऊ शकते. त्यामुळं वजन नियंत्रणात ठेवावं. तसंच काम करताना दर अर्ध्या तासानं उठून थोडं चालावं.
4) सरळ उभं रहा. डोकं पुढील बाजूस सरळ असावं. दोन्ही बाजूंनी आपलं वजन समतोल राखून ठेवा. तुमचे पाय सरळ ठेवा आणि डोकं मणक्याच्या रेषेत सरळ ठेवा.
5) वस्तू उचलतानाही काळजी घ्या. शरीराचा समतोल ठेवून केवळ गुडघ्यातून वाकून शरीराच्या जवळ वजन धरून ठेवा. शक्य तितके कमीत कमी तुमच्या पाठीची स्थिती बदलताना पाय सरळ करा.
6) प्रवास करताना पाठीला योग्य आधार द्या. लांबचा प्रवास असेल तर भरपूर विश्रांती घ्या.
7) झोपताना चांगल्या प्रतीच्या गादीचा वापर करा. यामुळं तुमच्या मणक्यावर ताण पडणार नाही. उशीचा उपयोग करा. परंतु तुमच्या मानेला त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या.
8) फ्लॅट शूज वापरल्यानं पाठीवर कमी ताण येतो.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.