अण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्त्या रद्द !
बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजप ( BJP) सरकारच्या काळात झालेल्या अण्णासाहेब पाटील ( Annasaheb Patil) आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे.राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य, विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या महायुतीच्या सरकारच्या काळात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aaghadi) सरकार आल्यानंतर सरकारने मागील २ वर्षांच्या कामाचा आढावा घेऊन एक वर्ष काम करण्याची संधी दिली होती. परंतु ही मुदत संपुष्टात आल्याने या नियुक्त्या सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला.
राज्यात १८ हजार तरुणांना रोजगार
भाजप सरकारच्या कालखंडात महामंडळाची जबाबदारी नरेंद्र पाटील ( Narendra Patil) व संजय पवार( Sanjay Pawar) यांच्यावर सोपविल्यानंतर गेल्या दोन वर्षांत राज्यात १८ हजार तरुणांना रोजगारासाठी १ लाख कोटींचे विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दीड हजार तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी ११७ कोटींचे वाटप केले.
दरम्यान, यावर भाष्य करताना महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार म्हणाले की, नियुक्त्या रद्दबाबत अद्याप महामंडळास कोणतेच पत्र आलेले नाही. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या विश्वासाने महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्यास पात्र राहून काम केले. भविष्यात पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेन. त्यामुळे आता या महामंडळावर काेणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांची नजर लागून आहे.
Comments are closed.