पुणे : बहुजननामा ऑनलाईन – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने आर्थिकदृष्टया मागासलेल्या तरुणांना उद्योग, व्यावसायासाठी चालना देण्याचे काम होत आहे. त्यातून तरुणांनी चांगला व्यावसाय करून महामंडळाने दिलेले कर्ज मुदतीत फेडावे, असे आवाहन पुणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, महसुल मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील यांनी केले.
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा पुणे व सोलापुर कार्यालयाअंतर्गत बिजभांडवल व अनुदान योजनेच्या प्रातिनिधिक स्वरूपात ९ लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या बिजभांडवल रक्कमेच्या धनादेशांचे वाटप पालकमंत्री मा. चंद्रकांत पाटील यांचे हस्ते व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अमित गोरखे यांच्या उपस्थीतीत आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड प्राधिकरण कार्यालयात करण्यात आले.
यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष मा. अँड. सचिन पटवर्धन, नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. सदाशिव खाडे, आमदार तथा भाजप शहराध्यक्ष मा. लक्ष्मण जगताप, आमदार मा. महेश लांडगे, तसेच, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिलीप खुडे, तसेच श्री. शिवाजी मांजरे, श्री. एन. एम् वाघमारे व श्री. एल. ए. क्षिरसागर आणि जिल्हा व्यवस्थापक महामंडळाचे कर्मचारी, लाभार्थी आदी उपस्थित होते.