Anjali Damania On Dhananjay Munde | त्यांनी मला ‘बदनामिया’ नव्हे, ‘पुराविया’ म्हटलं पाहिजे होतं, बीडमध्ये मुंडेंनी मामीची जमीनही लाटली, दमानियांचा धनंजय मुंडेंवर पलटवार

मुंबई : Anjali Damania On Dhananjay Munde | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित कृषी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, त्यानंतर ताबडतोब पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी दमानिया यांचीच खिल्ली उडवत त्यांना अंजली बदनामिया म्हटले. तसेच त्यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले. यावर आता अंजली दमानिया यांनी जोरदार पलटवार केला आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या खुलाशानंतर अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी कृषी खात्याचे मंत्री म्हणून काम केले असते तर त्यांना खात्यात काय सुरू आहे याची माहिती असती. पण त्यांनी बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचे काम केले. त्यांनी त्यांच्या मामीची जमीनही बळकावली.
अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात भ्रष्टाचार केला आहे. मी बदनाम लोकांच्या विरोधात पुरावे देत असल्याने काहीही म्हणा. मी धनंजय मुंडे यांना त्यांची जागा दाखवली. त्यांनी मला बदनामिया म्हटले, पण त्यांनी मला पुराविया म्हटले पाहिजे होते.
अंजली दमानिया यांनी केलेले आरोप
अंजली दमानिया यांनी उपस्थित पत्रकारांना काही उत्पादनांची मूळ किंमत ऑनलाईन दाखवून आरोप केले की, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाईड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. ही उत्पादने विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी तत्कालीन कृषीमंत्री असताना वाढीव पैसे आकारले आहेत.
नॅनो यूरियाची 92 रुपयाची बॉटल 220 रूपयांना
अंजली दमानिया म्हणाल्या, ही उत्पादने इफको नावाच्या कंपनीची आहेत. नॅनो यूरियाचा 184 रुपये लिटर दर आहे. म्हणजे 500 मिलिलीटरच्या बॉटलला 92 रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले त्यामध्ये ही 92 रूपयांची बॉटल 220 रुपयात घेण्यात आली. मुंडे यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल प्रति 220 रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या असा आरोप दमानिया यांनी केला.
नॅनो डीएपीची 269 रुपयाची बॉटल 590 रूपयांना
तर नॅनो डीएपी खरेदीच्या कथित घोटाळ्याचा आरोप करताना अंजली दमानिया म्हणाल्या, नॅनो डीएपीची किंमत 522 रुपये लिटर आहे. म्हणजे 500 मिलिलीटरची बॉटल ही केवळ 269 रुपयाला मिळते. कृषी खात्याने 19 लाख 57 हजार 438 घेतल्या. त्याचा बाजार भाव 269 रुपये, पण कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला खरेदी केली. हे दोन्ही घोटाळे 88 कोटींचे आहेत.
बॅटरीची किंमत 2450, खरेदी केली 3426 रूपयांना
बॅटरी खरेदीच्या कथित घोटाळ्याबाबत अंजली दमानिया म्हणाल्या, बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो 2450 रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर 2946 रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडरमध्ये 3426 रुपयाला ही बॅटरी विकत घेतली.
म्हणजे प्रत्येक बॅटरी स्पेअरवर एक हजाराच्यावर पैसे कमावले. डीबीटी योजनेत 5 लाखांहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेट ठरले होते. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ दिला गेला, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला.