कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेत आजकाल राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांच्या एका निर्णयाविरोधात लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी स्वीडिश मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीची शिक्षा माफ केली आहे. सोशल मीडियासह अन्य प्लॅटफॉर्मवर लोक त्यांच्यावर टीका करीत आहेत. आरोपी जुड जयमाहा एक श्रीमंत आणि हाय प्रोफाइल कुटुंबातील आहे. राष्ट्रपतींनी आपली शिक्षा माफ केल्यानंतर तो शनिवारी वेलीकादा कारागृहातून बाहेर आला.
राष्ट्रपती सिरीसेना यांनी गेल्या महिन्यात जयमाहा याच्या माफी याचिकेवर विचार करीत असल्याचं जाहीर केलं होत. २००५ मध्ये जयमाहाने कोलंबोमधील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्वीडन तरुणी वोन जॉनसन हिची मारहाण हत्या केली. ती श्रीलंकेला फिरायला आली होती आणि जयमाहाबरोबर तिचा वाद झाला होता. तिच्या कवटीचे ६४ तुकडे झाल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
वोन जॉनसन हत्येप्रकरणी जयमाहाला १२ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आणि सोबतच त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
वोन जॉनसनची बहीण कैरोलीन यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट केले. त्यात त्यांनी लिहिले की, ‘मारेकरी जयमाहाला अजिबात पश्चाताप नाही. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी स्वत: ला खूप सांभाळले आणि आता पुन्हा १५ वर्षानंतर आम्ही न्यायासाठी लढा देत आहोत.