वंचित आघाडीमुळे महाराष्ट्रात चमत्कार घडेल : आनंदरराज आंबेडकर

आनंदराज आंबेडकर
February 27, 2019
जालना : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात चमत्कार घडेल, असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी ही सत्ताधाऱ्यांची बी टीम असल्याच्या आरोप त्यांनी फेटाळून लावला.

रिपब्लिकन सेनेच्या निर्धार मेळाव्यानिमित्त जालन्यात आलेले आंबेडकर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे वाकोडे, संजय बोधनकर, विलास डोळसे, सद्दाम खान, सुधाकर निकाळजे आदींची उपस्थिती होती. आतापर्यंत विविध समाजातील जे घटक सत्तेपासून वंचित होते, या घटकांना सत्तेत आणण्यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. आघाडीच्या राज्यात सर्वत्र सभा होत असून या सभांना लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी पाहता ती परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. मात्र, गर्दीचे रूपांतर मतांत होणार नाही, या रामदास आठवलेंच्या वक्तव्याविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांचे ते वक्तव्य हास्यास्पद असून ते कोणतीही गोष्ट किती गांभीर्याने बोलतात, हे आपण नेहमी पाहत आलो आहोत. त्यांची काय अवस्था आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. राज्यात असे एकपात्री नाट्यप्रयोग चालतच असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुलवामामधील दहशतवाद्यांचा हल्ला हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याची टीका करत काश्मिरात सैन्य तैनात असताना स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या जवानांच्या काफिल्यातील वाहनांवर धडकते कशी? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणात मला काही बोलायचे नाही, परंतु गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरही परखड मत व्यक्त केले.