नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील अमरोहातील बामन खेडी गावातील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी शबनमला लवकरच फासावर लटकवले जाणार आहे. केवळ प्रतीक्षा आहे ती डेथ वॉरन्टवर हस्ताक्षर होण्याची. मात्र, शबनमनचा मुलगा ताजने आपल्या आईची शिक्षा माफ करण्याची विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी केली आहे.
ताजने या मागणीबरोबरच आईला तुरुंगात भेटायला जाण्याच्या काही आठवणीही सांगितल्या. रामपूर तुरूंगात तो आईला भेटायला जात होता. आठवणी सांगताना ताज म्हणाला की, त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करते. ती त्याला मीठी मारते आणि कुशीत लपवते. त्याला पैसेही देते.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी त्याच्या आईची शिक्षा माफ करावी. जेणेकरून तो अनाथ होणार नाही. तुरुंगात ताजला शबनम भेट होती त्यावेळी ती त्याला सांगायची की मन लावून अभ्यास कर. मन लावून अभ्यास करशील तेव्हाच पुढे जाशील. ताजचा जन्म तुरुंगातच झाला. ताज जेव्हा ६ वर्षाचा झाला तेव्हा त्याला तुरूंगातून बाहेर पाठवण्यात आलं. त्यानंतर अमरोहा जिल्हा प्रशासनाने त्याची कस्टडी उस्मान सैफी यांना दिली होती. बुलंदशहरच्या सुशीला विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या कस्टोडीअन उस्मान सैफीच्या परिवारासोबत ताज राहतो.
उस्मान सांगतात की, बुंदलशहरच्या चांगल्या शाळेत ताज शिकतो. तिथे त्याच्यासाठी सर्वच व्यवस्था आहे. ताजची आई शबनमकडे भरपूर प्रॉपर्टी आहे. त्यांनी तिला सांगितले की तिने तिची प्रॉपर्टी शाळा, कॉलेज, हॉस्पिटलला दान करावी.
उस्मान सैफी यांच्या पत्नी वंदना सिंह म्हणाल्या की, ताजला कस्टडीत मिळाल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागला. कालांतराने ताजही जुळवून घेऊ लागला. शिक्षिका असल्याने माँ माहित आहे की या वयात मुलांना काय हवं असत. त्यामुळे मी ताजची व्यवस्थित काळजी घेऊ शकते असेही त्या म्हणाल्या. जरी ताजने तुरुंगात जन्म घेतला असला तरी सामान्य मुलाप्रमाणे वंदना आणि उस्मान यांच्या अपेक्षांवर खरा ठरला.
अमरोहातील बामन खेडी गावात राहणाऱ्या शबनमने १५ एप्रिल २००८ रोजी प्रियकर सलीमसोबत मिळून प्रेमात अडसर ठरलेल्या वडील, आई, दोन भाऊ, मावशीची मुलगी आणि भाच्याची हत्या केली होती. न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती. राष्ट्रपतींनीही तिचा माफी अर्ज फेटाळला होता.
दरम्यान, शबनमला फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे. मथुरा येथील तुरूंगात शबनमला फाशी देण्यात येणार आहे. तुरूंग प्रशासनाने फाशी देण्यासाठी दोराची ऑर्डर दिली आहे. तसेच जल्लाद पवन याने फाशी घराची पाहणीही केली आहे. आता प्रतीक्षा आहे ती शबनमच्या डेथ वॉरन्टची. एका महिलेला दिली जाणारी ही फाशी स्वतंत्र भारतात पहिलीच असेल.