Amit Shah On Eknath Shinde | मुख्यमंत्री पदावरून अमित शहांचे महत्वाचे विधान; म्हणाले – ‘त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला, पण आता…’

October 16, 2024

मुंबई: Amit Shah On Eknath Shinde | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत जागावाटपाचं (Mahayuti Seat Sharing Formula) घोडं अद्यापही अडलेलचं दिसत आहे. त्यावरून महायुतीतील तिन्ही पक्षात धुसफूस सुरु आहे. अशातच ” त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. पण आता तुम्ही झुकते माप घ्या..” असे भाष्य अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटपासंदर्भात दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीतील मित्रपक्षांचा आदर राखण्याच्या सुचना दिल्या. इतकेच नव्हे तर, एकनाथ शिंदेंना मवाळ भूमिका घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

जागावाटपाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे १०० पेक्षा कमी जागांवर तडजोड करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमित शहांनी एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेत सौम्य भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

“या देशात पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री ही दोन पदे महत्त्वाची आहेत. गृहमंत्र्यांसह इतर सर्व पदे ही केवळ व्यवस्था आहे. काम पूर्ण करण्यासाठी ही यंत्रणा आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले, तुमच्यासाठी आमच्या लोकांना त्याग करावा लागला. त्यामुळे तुमच्या मित्रपक्षांना जागा वाटप करून तुम्ही मोठे मन दाखवावे”, असे अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे.