नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारताने 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबंदीला अमेरिकेनेही समर्थन दिले आहे. या बंदीमुळे भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केले आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या या अॅपवर भारताने घातलेल्या बंदीचे आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचे रक्षण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेच्या काही खासदारांनी शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अॅप्सला देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हणत असे पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन रिक क्रॉफर्ड यांनी ट्विट करत टिकटॉकला अवश्य जायलाच पाहिजे असे म्हटले आहे. चीन सरकार स्वत:च्या उद्दिष्टांसाठी टिकटॉकचा वापर करत आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये अशी किमान दोन विधेयके सध्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये सरकारच्या अधिकार्यांना त्यांच्या फोनवर टिकटॉक वापरण्यास बंदी घालण्याचं म्हटले आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे.