सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची आज सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक भेट झाली.बाळासाहेब आंबेडकर हे नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि बाळासाहेब वाघमारे यांच्यासमवेत नाश्ता करण्यासाठी थांबले होते.
प्रकाश आंबेडकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदेही त्यावेळी बालाजी सरोवर येथे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले होते. प्रकाश आंबेडकर तिथेच बसल्याचं समजल्यावर शिंदेंनी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली.
आंबेडकर आणि शिंदे यांच्या काही मिनिटाच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून दोघांनी एकमेकांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.अवघ्या काही मिनिटांचा हा प्रसंग होता असं सांगण्यात आले. परंतु यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरु झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.