मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या नवनिर्वाचित आमदारांसह विधानभवनात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला आमदारांसोबत फोटोसाठी पहिल्या रांगेत थांबविल्याने त्यांच्याबद्दलचा आदर आमदारांत आणखीच वाढला. पवारांच्या या कृतीने आमदार भारावून गेले.
आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधान भवनात आले होते. त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व मंडळी रवाना झाली. यावेळी विधानभवना बाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर सदस्यांच्या आग्रहास्तव पवारांनी सर्वांसमवेत एक फोटो काढला.
फोटो काढताना अचानक त्यांचे लक्ष कोपऱ्यात उभा असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेले. त्यावेळी, खुद्द पवारांनी त्या सुरक्षारक्षकाला बोलवून घेतलं. विशेष म्हणजे पहिल्या रांगेत उभे करुन स्वतःसोबत फोटो काढला. पवारांच्या या लहान परुंतु भावनिक कृतीने अनेकांचे लक्ष वेधले. तर, त्या सुरक्षारक्षकालाही गहिवरुन आले. या फोटोनंतर पवारांच्या या कृतीचीच चर्चा सर्वत्र रंगली होती. सध्या सोशल मीडियावरही हा फोटो शेअर होत आहे.
Visit : bahujannama.com