मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – वंचितमधून बाहेर पडल्यानंतर एमआयएमने आता आपले विधानसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. यात तीन जागांचा समावेश आहे. उमेदवार जाहीर करून एमआयएमने इतर पक्षांना चांगलाच धक्का दिला आहे. नुकतीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा केली.
एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरीमधून डॅनियल लांडगे नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला, तर मालेगाव येथून मुफ्ती मोहंमद इस्माईल याना उमेदवारी दिली आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला तलाक दिल्यानंतर आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. एमआयएमने 74 जागांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. इतकेच नाही तर उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू करण्यात आल्या आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून वंचित आणि एमआयएममध्ये फूट पडली आहे. जलील यांनी आधीच स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यानंतर दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप होताना दिसले. यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आघाडीतील बिघाडीवर शिक्कामोर्तब केलं. इम्तियाज जलील यांनी केललं वक्तव्य म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं स्पष्टीकरण ओवेसी यांनी दिलं.