मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात देशातल्या दुसऱ्या अखंड प्रज्वलित राहणाऱ्या भीमज्योतीचं अनावरण करण्यात आलं आहे. खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते आज सकाळी या अखंड भीमज्योतीचा अनावरण सोहळा झाला. आजच हा कार्यक्रम पार पडला. ही भीमज्योत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आली आहे.
ही दुसरी भीमज्योत
अखंड प्रज्वलित राहणारी पहिली भीमज्योत मुंबईतील ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पू्र्णाकृती पुतळ्यासमोर तीन महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात आली होती. यानंतर आता दादरमधील चैत्यभूमी परिसरात ही दुसरी अखंड भीमज्योत उभारण्यात आली आहे. तथागत गौतम बुद्धांचा ‘अत्त दीप भव’ म्हणजेच ‘स्वयंप्रकाशित व्हा’ हा संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही ज्योत उभारण्यात आली आहे.
भीमज्योतीचा खर्च…
महापालिका वास्तुविशारदांकडून भीमज्योतीचा आराखडा करण्यात आला. भीमज्योतीसाठी महापालिकेला 21 लाख 54 हजार रुपये एवढा खर्च आला. तर चैत्यभूमी परिसराच्या सुशोभिकरणासाठी तसेच अन्य बाबींसाठी 42 लाख 74 हजार इतका खर्च अपेक्षित आहे.
भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडे सात फूट रूंद
चैत्यभूमीवरील भीमज्योत ही सव्वा आठ फूट उंच आणि साडे सात फूट रुंद आहे. 8 मिमी काचेच्या आवरणाआड ही ज्योत तेवत राहणार आहे. महानगर गॅसतर्फे या ज्योतीला अखंड गॅस पुरवठा केला जाणार आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे.