बहुजननामा ऑनलाइन टीम – गुजरात कॅडरचे माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी राजकारणाचा डाव खेळण्याचा(AK Sharma) निर्णय घेतला आहे. शर्मा गुरुवारी लखनऊमध्ये भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. युपीच्या मऊ जिल्ह्यातील राहणारे अरविंद कुमार शर्मा यांचे निवृत्तीचे वर्ष 2022 होते, परंतु त्यांनी अचानक स्वेच्छा निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अति विश्वासू अधिकार्यांपैकी एक आहेत. भाजपा त्यांना विधान परिषदेवर पाठवू शकते.
अरविंद कुमार शर्मा 1988 बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 2001 पासून 2013 पर्यंत गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध पदांवर काम केले आहे. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान होऊन दिल्लीत आले तेव्हा अरविंद शर्मा सुद्धा त्यांच्या सोबत पीएमओमध्ये आले होते. सध्या ते पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव पदावर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू अधिकारी असलेले अरविंद कुमार शर्मा मुळचे यूपीचे राहणारे आहेत. ते युपीच्या मऊ जिल्ह्यात मुहम्मदाबाद गोहना तहसीलच्या रानीपुर विकास विभागांतर्गत काझाखुर्द गावचे आहेत. शर्मा यांचा जन्म 11 एप्रिल 1962मध्ये झाला, त्यांच्या वडीलांचे नाव शिवमूर्ती राय आणि आईचे नाव शांतीदेवी आहे. त्यांनी आपले सुरूवातीचे शिक्षण प्राथमिक विद्यालय आणि मऊच्या डीएव्ही इंटर कॉलेजमधून इंटरमीजिएटपर्यंत शिक्षण पूर्ण केले. यानंतर पदवीसाठी अलाहाबाद विद्यापीठात आले.
अरविंद शर्मा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी आणि नंतर राज्यशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. यानंतर 1988 मध्ये त्यांची निवड गुजरात कॅडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेसाठी झाली. अरविंद शर्मा यांची एसडीएम पदावर पहिली नेमणूक 1989 मध्ये झाली आणि नंतर डीएम बनले. 1995 मध्ये ते मेहसाणाचे कमिश्नर झाले. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या सचिवाची जबाबदारी शर्मा यांना मिळाली. येथूनच पीएम मोदी यांचा विश्वास त्यांनी संपादन केला.
अरविंद शर्मा यांना 2013 मध्ये पदोन्नती देऊन मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त प्रमुख सचिव ही जबाबदारी देण्यात आली. यानंतर पीएम मोदी 2014 मध्ये दिल्लीच्या सत्तेत विराजमान झाले तेव्हा त्यांना सोबत घेऊन आले. जून 2014 मध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर ए. के. शर्मा यांना पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिवाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत ते पीएमओमध्ये होते. व्हीआरएस घेताना ते पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव होते.
अरविंद कुमार शर्मा सेवानिवृत्त झाल्यानंतर गुरुवारी लखनऊला पोहचत आहेत आणि दुपारी भाजपा सदस्य म्हणून शपथ घेऊ शकतात. भाजपा त्यांना विधान परिषदेवर पाठवू शकते. पीएमओमध्ये त्यांची पकड पाहता असे मानले जात आहे की, उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांची भूमिका खुप महत्वपूर्ण ठरणार आहे. शर्मा यांच्या प्रशासकीय दक्षतेचा लाभ घेण्यासाठी त्यांना योगी मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.