Ajit Pawar On Airport In Pune | ‘पुणेकरांना स्वतंत्र विमानतळ नाही, ही माझीही खंत’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

July 20, 2024

पुणे: Ajit Pawar On Airport In Pune | शहराला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची असलेली गरज सातत्याने अधोरेखीत झाल्याने विमानतळासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन अनेकदा प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिलेले आहे. स्वतंत्र विमानतळ नसणे ही बाब शहराच्या लौकिकास शोभणारी नसल्या बाबतीतही चर्चा झालेली आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाष्य केले आहे.

चिंतामणी ज्ञानपीठ (Chintamani Dnyanpeeth) आणि अप्पा रेणूसे मित्र परिवाराच्या (Appa Renuse Mitra Parivar) वतीने शनिवारी (दि.२०) गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Rangmanch) येथे गुरूजनांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले ,”माझ्यासह पुणेकरांची एक खंत आहे की, आपल्याकडे सरकारी विमानतळ नाही. ते असले पाहिजे. सध्या जे आहे ते संरक्षण विभागाचे आहे. पण आपल्या स्वतंत्र विमानतळासाठी आम्ही अनेकदा मिटिंगा घेतल्या. पण त्यावर मार्ग निघालेला नाही. त्यासाठी लोकं जमिनी द्यायला का कू करतात. पण कधी ना कधी पुणेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मराठीला अभिजात दर्जा मिळायलाच हवा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत. आम्ही नुकताच विधीमंडळात ठराव केला असून, तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. राज्यातील १३ कोटी जनता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पाहत आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही त्यांनी सांगितले.