Ajit Pawar NCP | अजित पवारांकडून केंद्रातही मंत्रिपदाची मागणी, अमित शहांकडून अटी-शर्ती; म्हणाले – ‘शरद पवारांचे आमदार, खासदार…’

December 4, 2024

मुंबई: Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला करिष्मा दाखवू शकला नसला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार बॅटिंग करत ५४ पैकी तब्बल ४१ आमदार निवडून आणून आपला स्ट्राइक रेट वाढवलाय. आता याच स्ट्राईक रेट वर पुढील वाटाघाटीत बोलणी सुरू केली असल्याची माहिती मिळतेय.

राष्ट्रवादीने राज्यातील मंत्रिमंडळात जादा मंत्रीपदे मागितली आहेत, शिवाय दिल्लीत देखील कॅबिनेट मंत्रीपद द्या, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीला अद्याप हिरवा कंदील मिळाला नसला तरी तो हवा असल्यास भाजप नेतृत्वाने देखील काही अटी शर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर ठेवल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या बळावर दिल्लीत एक कॅबिनेट आणि राज्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच आपल्या देखील पक्षाला तितकीच मंत्रीपदं दिली जावीत, अशी मागणी अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली आहे. दरम्यान शहा यांच्याकडून देखील एक अट टाकण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांसोबत असलेले आमदार आणि खासदार सोबत आल्यास प्रफुल पटेल यांना केंद्रात संधी देण्याबाबत विचार केला जाईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यामुळेच मागील काही दिवसांपासून अजित पवाराच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने खासदार आणि आमदाराना संपर्क साधण्यात येत आहे.