मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एकीकडे कोरोनाचे संकट उभं आहे. आणि दुसरीकडे म्युकर मायकोसिस हा एक आजार लोकांच्या संकटात येऊन बसला आहे. राज्यात म्युकर मायकोसिस रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कालच एक बैठक घेतली. म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अजित पवार यांनी बैठकीदरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातील २५ % निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कमही आरोग्य सेवेवर खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस (Mucor mycosis) आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करावी. राज्यातील रुग्णालयांचे प्राणवायू, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट तसेच म्युकरमायकोसिसच्या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरू केल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे अशा रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरू करावेत. या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही.
म्युकरमायकोसिस आजारावरील औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकरमायकोसिस रुग्णांची अपडेट नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटतर्फे काही प्रमाणात म्युकरमायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तर जागतिक निविदाच्या माध्यमातून हे औषध उपलब्ध होणार आहे. जूनमध्ये या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल. परंतु रेमडेसिवीरप्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य, प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या दरम्यान, राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा, अशा सूचना देखील अजित पवार यांनी दिल्या आहेत.