Ajit Pawar-Girish Mahajan | निधीवरून अजित पवारांनी भाजप नेत्याला सुनावले; म्हणाले – ‘…आता काय राज्यातील जमिनी विकायच्या का?’
मुंबई : Ajit Pawar-Girish Mahajan | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. विकासकामांच्या निधीवरून दोन्ही नेत्यात वाद झाला आहे. गिरीश महाजन यांनी विकास निधीची मागणी केल्यानंतर अजित पवारांनी पैसे नसल्याचे कारण देऊन मागणी फेटाळल्याने वाद झाला.
ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. मात्र गिरीश महाजन यांच्या मागणीनंतर पैसे कोठून आणू. आता काय राज्यातील जमिनी विकायच्या का? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
यानंतर अजित पवार यांनी सिन्नर तालुक्यात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या मतदारसंघात एका स्मारकसाठी कोट्यावधी निधीच्या तरतुदीचा मुद्दा मांडला. मात्र त्यावेळी पैसे नाहीत म्हणून नको तिथे खर्च करायला नको ही तुमची भूमिका असेल तर या स्मारकासाठी कोट्यवधींचा खर्च कशाला? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
Comments are closed.