मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – कोरोना संकटाचा सामना करतानाच गेल्या काही दिवसापासून राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील दाखल झाले. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि. 26) संध्याकाळी शरद पवारांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. राज्यातील एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून राज्याला कोरोना संसर्गाच्या काळात मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.