मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या ग्राहकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने मोठं पाऊल टाकलं आहे. आपल्या इंटरनेट टीव्ही बॉक्ससोबत एअरटेलनं नेटफ्लिक्स आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅप सब्सक्रिप्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल इंटरनेट टीव्ही सोबत डीटीएच एचडी सेवा आणि ओटीटी अॅप सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळते. एअरटेल इंटरनेट टीव्हीचा इंटरनेट बॉक्स एक स्मार्ट सेट टॉप बॉक्स आहे.
एअरटेलच्या या ऑफरमध्ये युजर्सला नेटफ्लिक्सचं 500 रुपयांचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. या एक्स्ट्रीम अॅपमध्ये युजर्सला 1200 रुपयांचं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये नेटफ्लिक्सशिवाय जी- 5, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार, सोनी LIVE आणि इतर सेवा मिळणार आहेत. परंतु या सर्व ऑफर्सचा लाभ नवीन बॉक्स खरेदी केल्यावरच मिळणार आहेत.
एअरटेल बॉक्स मिळणार 2269 रुपयांत
या नव्या ऑफर्समध्ये ग्राहकांना 1700 रुपयांचा फायदा मिळणार आहे. इंटरनेट बॉक्सच्या किंमतीत एअरटेलने कपात केल्याने हा बॉक्स ग्राहकांना 2269 रुपयांत मिळणार आहे. इतकेच नाही तर 699 रुपये किमतीचा एचडी चॅनल डीटीएच पॅकही ग्राहकांना मोफत मिळणार आहे.
ऑगस्ट 2017 मध्ये लाँच झालेल्या एअरटेल इंटरनेट सेवेची किंमत 4999 रुपये होती. मात्र जिओ फायबर आल्यानंतर एअरटेलनंही आपल्या बॉक्सची किंमत कमी केली आहे. येत्या 5 सप्टेंबरपासून जिओ फायबरची सेवा सुरु होत आहे. त्यामुळे नवीन ऑफर्स देत ग्राहकांना खुश करण्यासाठी एअरटेलनं मोठं पाऊल टाकलं आहे.