नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला बार कौन्सिल अध्यक्षांची आग्रा येथील सत्र न्यायालयाच्या आवारात त्यांच्या सहकारी वकिलानेच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. दर्वेश यादव असे हत्या झालेल्या वकील महिलेचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांची महिला बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड झाली होती.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा आग्रा न्यायालयीन कार्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरोपी देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होता. आरोपी मनीष शर्मा आणि दर्वेश यादव हे दोघे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे अर्धा तास आधी त्यांच्याबरोबर असणाऱ्या मनीष शर्माने त्यांची हत्या का केली असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्या अरविंद कुमार यांच्या केबिनमध्ये बसलेल्या असताना तिथे आलेल्या आरोपी मनिष शर्मा याने दर्वेश यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर शर्मा याने स्वत:वरही गोळी झाडली. यामध्ये दर्वेश यांना एक गोळी डोक्यात आणि एक छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यानंतर आरोपी मनीष शर्मा याने देखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, या हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मनीष शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपस सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.