ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – ठाण्यात एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिने वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाला आहे. या तरुणीचे नाव मेघना देवगडकर असून वय २२ वर्ष आहे. ती एक नृत्यांगना असून जिममध्ये ट्रेनर म्हणूनही काम करत होती. ज्या गोळ्या घेण्यावर बंदी होती, नेमक्या त्याच गोळ्या तिने घेतल्या.
मेघनाने जिममध्ये जाण्याअगोदर गोळ्या घेतल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच तिने जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. गोळ्या घेतल्यानंतर उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला जवळच्याच डॉक्टरकडे नेण्यात आले. तसेच लाईफलाइन हॉस्पिटल आणि नंतर सायन हॉस्पिटल नेऊन तिला आयसीयूमध्ये दाखल केले. पण कार्डियाक अरेस्ट आल्याने मेघनाचा मृत्यू झाला. गोळ्या घेतल्याच्या पंधरा तासांच्या आतच तिचा मृत्यू झाला.
तसेच या गोळ्या घेतल्यांनंतर मेघनाला हायपरथरमियाचा त्रास होऊ लागल्याने तिच्या शरीरातील तापमान जास्तच वाढले. तसेच रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळेच तिचा कार्डियाक अरेस्टने मृत्यु झाला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून एफडीएला अहवाल पाठवण्यात आला आहे. तसेच मेघनाला बंदी घातलेल्या गोळ्या कशा मिळाल्या त्याचाही तपास सुरु आहे.