भाजपच्या ‘त्या’ दाव्यानंतर शरद पवारांंनी राज ठाकरेंबद्दल केलं ‘मोठं’ विधान, म्हणाले…

sharad pawar
February 22, 2020

मुंबई : वृत्तसंस्था  –  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जवळीक वाढली आहे. निवडणूक होण्याअगोदर राज ठाकरे आणि शरद पवार हे एकत्र येत मनसे आघाडीत सहभागी होतील अशी चर्चा होती. पण निवडणुकीत मनसेने आघाडीमध्ये सहभाग घेतला नसून काही मतदारसंघात मनसेला पूरक होईल, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती.

शरद पवार यांच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेतल्यामुळे राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला का?, असा प्रश्न उपस्थित केला गेला. तर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत पक्षाच्या भगव्या रंगाचा नवीन झेंडा आणल्यावर त्यावर राष्ट्रवादीने टीका केली होती. तास एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंना समर्थन देणारा मोठा वर्ग असून तो प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होतो का, याबाबत शंका आहे. राज ठाकरेंची मते जाणून घेण्यासाठी लोकं उत्सुक असतात, असे पवारांनी सांगितले. राज ठाकरेंबद्दल मतभेद असतील पण आमच्यात मनभेद नसून सुसंवाद आहे. आजही आमचं बोलणं होत असतं, राजकारणात एक पोकळी असते, तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून पोकळी निर्माण झाली आहे. विरोधाची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत असून त्यामुळे ही पोकळी भाजपा भरुन काढेल की मनसे हे येणाऱ्या काळात ठरेल, असेही पवार यांनी सांगितले.

रिमोट माझ्या हातात नसून आम्ही सरकार उभं केलं आहे. विचारल्याशिवाय मत द्यायचं नाही ही माझी भूमिका आहे. तर राज्याच्या हिताबाबत काही सूचना द्यायची असेल तर पक्षाच्या अंतर्गत चर्चा होते. केंद्र सरकारच्या बाबतीत महाराष्ट्राची भूमिका मांडायची असेल तर सगळेच एकत्र येतो. मार्क देण्यासाठी परीक्षेची वेळ आली नाही, पण उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य आहे, असे म्हणत पवारांनी ठाकरेंचे कौतुक केले.