नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. पटियाला हाऊस कोर्टाने गुरुवारी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे की, दोषी विनयची मानसिक स्थिती अत्यंत वाईट आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की त्याने स्वत:ला दुखापत करून घेतली आहे. कारागृहाच्या भिंतीवर डोके आपटून त्याने स्वत:ला जखमी केले आहे. दोषीचे वकील एपी सिंह यांच्या या याचिकेवर कोर्टाने तिहार तुरूंगात विनयवर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. आता याप्रकरणी पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.
त्याच वेळी, दोषी विनयचे वकील एपी सिंह यांनी म्हटले आहे की, विनयची मानसिक स्थिती इतकी खराब झाली आहे की त्याने स्वत:ला दुखापत करून घेतली आहे. त्याने स्वत:चं डोकं फोडून घेतलं आहे. याबाबत कोर्टाला विनंती करण्यात आली आहे की, याबाबत कारागृहाकडून माहिती करून घेण्यात यावी. तसेच दोषी विनयला उच्चस्तरीय उपचार दिले जावेत.
विनयचे वकील निवडणूक आयोगापर्यंत पोहचले
विनयचे वकील ए.पी. सिंह यांनी निवडणूक आयोग गाठले आहे. त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडेही याचिका दाखल केली आहे. ते म्हणतात की विनय शर्मा यांची दया याचिका 30 जानेवारीला दिल्ली सरकारपर्यंत पोहोचली. परंतु जेव्हा नकार देण्यात आला तेव्हा मनीष सिसोदिया त्यावेळी आमदारही नव्हते आणि दिल्ली सरकारचे गृहमंत्रीही नव्हते. त्यावेळी दिल्लीत आचारसंहिता होती. एवढेच नाही तर त्यांची ओएसडी स्वाक्षऱ्यांची डिजिटल कॉपी व्हाट्सअॅपचा स्क्रीनशॉट आहे. त्याला दया याचिकेसोबत लावले गेले आहे आणि त्याआधारे १ फेब्रुवारी रोजी विनयची दया याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.