आदिवासी – कोळी समाजाचे महसूल आयुक्तालयासमोर धरणे

आदिवासी
February 1, 2019
नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – संवैधानिक अधिकार असूनही महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यांनी दिलेला निवेदनात म्हटले आहे, संवैधानिक अधिकार असूनही महाराष्ट्रातील कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी, ठाकर, ठाकूर, मन्नेरवारलू, हलबा, माना, गोवारी, तडवी, भिल्ल आदी तीस ते पस्तीस जमातींना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही.

जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून नेहमीच बेकायदेशीर व घटनाबाह्य वागणूक दिली जाते. त्यांचे जमातीचे दाखले कोणत्याही पुराव्याचा विचार न करता सरळ रद्दबादल केले जात आहेत. अन्यायग्रस्त जमातींनी दिलेला कोणत्याही महसुली वा अन्य पुराव्याचा विचार केला जात नाही. त्यांना संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. जात वैधतेची असंवैधानिक समस्या निर्माण करून त्यांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासापासून वंचित ठेवले जात आहे. निवेदनावर समितीचे जिल्हाध्यक्ष किसन सोनवणे, अर्जुन सरपणे, अण्णा मेणे, अश्ि­वनी घाणे, मंदा गायकवाड, विजय दरेकर, दिपक मोरे, आदींच्या सह्या आहेत.