ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे अश्लील शिवीगाळ करुन आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांचे फोटो फेसबुकवर प्रसारित करणा-या इसमास ठाणे गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. सुनिल रायभान पवार उर्फ सुनिल राजे पवार (28 रा. क्रांतीनगर, सिडको औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार केले होते. त्याद्वारे आरोपीने अश्लील तसेच शिवीगाळ असलेला मजकूर तसेच आव्हाड यांचे कौटुंबिक आणि वैयक्तिक फोटोही त्यावर प्रसारित केले होते. याप्रकरणी 8 एप्रिल 2020 रोजी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात शिवीगाळ करणे, धमकी देणे, विनयभंग तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सायबर सेलेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ, पोलीस नाईक अनुरोध गावित, कॉन्स्टेबल विजयअमर खरटमल, रवींद्र घोडके, गंगाधन तिर्थंकर, राजकुमार राठोड आणि सुजितकुमार तायडे आदींच्या पथकाने 18 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथून आरोपी सुनिल पवार याला अटक केली.