पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर थांबलेल्या ट्रकवर वेगातील स्विफ्ट कार पाठीमागून धडकून झालेल्या भीषण अपघातात स्विफ्ट कार मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रावेत पोलिस चौकीच्या हद्दीत हॉटेल सॅंटोसा समोर आज सकाळी सहा वाजता झाला आहे.
अभिषेक राहुल शर्मा (रा. काशीपुर, उत्तराखंड), पराग प्रवीण हेरगावकर (रा. कोथरुड, पुणे), सूरज राजेंद्र मांजरे यांची ओळखपत्रे मिळाले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी हॉटेल सॅंटोसा समोर मुंबई-पुणे मार्गावर जीटी ३१, टी २६१४ हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी पाठीमागून वेगात आलेल्या स्विफ्ट कार (एम एच १२, ईएम ९९७४) चालकाचे नियंत्रण सुटले. कार उभा असणाऱ्या ट्रकवर पाठीमागून जोरात धडकली. यामध्ये जागेवरच कारमधील तिघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. कारचा चक्काचुर झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानानी मृतदेह आणि जखमीला कारमधून बाहेर काढले. जखमीला उपचारासाठी आधार रुग्णालयात दाखल केले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले आहेत. रावेत पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. कारमध्ये तीनच ओळखपत्र मिळाल्याने मृत्यू झालेले कोण आणि जखमी कोण हे अद्याप समजू शकले नाही.