धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – लिपीक पदास मान्याता देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयातील लिपिकाला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले . ही कारावाई आज (शुक्रवार) दुपारी करण्यात आली. अतुल श्रीकांत सहजे (वय-४०) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असून सह संचालक, उच्च शिक्षण जळगाव यांनी त्यांच्या पदाला मान्यता दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देत त्याच्या पदाला मंजुरी देण्याचे आदेश दिले. तक्रारदार यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सह संचालक कार्यालयातील लिपीक अतुल सहजे याची भेट घेतली. त्यावेळी अतुलने ५० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मंजुर नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंदक विभागाकडे १४ मे २०१९ रोजी तक्रार दाखल केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता अतुल सहजे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने आज सहजे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.