मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बँकेतील कर्जावरील व्याजदर करुन देतो असे सांगून 20 हजार रुपयाची लाच मागून स्विकारताना दोन विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. कारवाई बुधवारी (दि.30) करण्यात आली. नारायण सुर्यभान यादव (वय-39) आणि किरण बाळासाहेब सुपेकर (वय-47) असे लाच घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच घेताना अटक करण्यात आलेले दोघेजण सांगली सहकारी बँक लि. दादर या बँकेचे विशेष वसुली व विक्री अधिकारी आहेत. तक्रारदार यांनी सांगली सहकारी बँक लि. दादर या बँकेतून कर्ज घेतले आहे. 50 हजाराच्या हप्त्यापैकी 30 हजार रुपये कर्जाच्या हप्त्यासाठी आणि कर्जावरील व्याजदर कमी करुन देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून नारायण यादव आणि किरण सुपेकर या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.