पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारी पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून फौजदारी कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारणार्या जिल्हा विशेष लेखा परिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
भगवंत नारायण बिडगर (वय ५६) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार खासगी लेखा परिक्षक असून त्यांनी एका सहकारी पतसंस्थेचे ऑडीट केले होते. त्या ऑडीटमध्ये भगवंत यांनी त्रुटी काढून फौजदारी कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून यापुर्वीच तीन लाख रुपये स्वीकारले. उर्वरित ७५ हजारांपैकी ५० हजारांची लाच स्विकारताना भगवंतला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर भगवंत यांना विशेष न्यायालयात हजर केले असता, त्यांना २५ फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या पथकाने केली.