मुंबई, बहुजननामा ऑनलाइन –मराठी अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांचं नुकतंच अमेरिकेत निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. ब्रेन कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी तो गेल्या वर्षी लॉस अँजेलिसला गेले होते. पण त्यांची लढत अपयशी ठरली. आमीर खानच्या पीके चित्रपटात साई यांनी भूमिका केली होती. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून साई यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केलं आहे.
‘ पी. के. सारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते साईप्रसाद गुंडेवार यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने हरहुन्नरी अभिनेता गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
साई यांनी 2010 मध्ये एम टीव्ही स्पिट्सव्हिलामध्ये भाग घेतला होता. त्यांनी अनेक चित्रपट आणि रिअलिटि शोंमध्ये काम केले होते. सैफ अली खान अभिनित बाजार हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.