नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA ने देशभरात घवघवीत यश मिळवले. त्यात दिल्लीतील सात जागांचाही समावेश आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यापार्श्वभूमीवर आगामी काळातील विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने लोकप्रिय घोषणांची सुरुवात केली आहे. ‘ दिल्लीकर महिलांना मेट्रो आणि बस प्रवास मोफत देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.’
यामुळे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहान मिळेल असे केजरीवाल यांनी म्हंटले आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास देऊन डीएमआरसीच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिल्ली सरकार करेल. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या योजना कशी लागू करता येईल, तसेच मोफत प्रवासाचा पास देता येईल की अन्य कोणता पर्याय देण्यात येईल आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.सध्या बस आणि मेट्रोमध्ये महिलांच्या प्रवासाचे प्रमाण ३३ टक्के आहे. यानुसार दिल्ली सरकारवर प्रतीवर्षी १२०० कोटींचा बोजा पडणार आहे.